मराठीतील वाकप्रचार आणि म्हणी

वाकप्रचार – पूर्वीच्या काळी स्त्रियांनी जात्यावर गायलेल्या ओव्या, लोकगीते, उखाणे, म्हणी, वाकप्रचार म्हणजेच लोकांनी तयार केलेल्या, लोकांमार्फत, लोकांपर्यंत पोहोचणाय्रा तोंडी गोष्टींना, गाण्यांना लोकवाङमय म्हणतात.

वाकप्रचार – भाषेमध्ये काही शब्द किंवा शब्दसमूह यांना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा प्रचारामुळे किंवा परंपरेने एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेल्या असतो त्यालाच वाकप्रचार म्हणतात.

म्हण – आपल्या भाषेत केव्हा केव्हा छोटीछोटी अर्थगर्भ वाक्य येतात. सुटसुटीतपणा व चटकदारपणा यामुळे ती लोकांच्या तोंडी सहज रुळतात त्यांना म्हण असे म्हणतात.

वाकप्रचार –

 • आवळ्याची मोट बांधणे – एकमेकांशी न जमणाय्रा लोकांना एकत्र आणणे.

सध्याच्या काळात सर्व विरोधी पक्षांनी एका झेंड्याखाली येणे म्हणजे आवळ्याची मोट बांधण्यासारखे आहे.

 • उखळ पांढरे होणे – खूप पैसा मिळणे.

दुष्काळाच्या दिवसात बरेच व्यापारी आपले उखळ अगदी पांढरे करुन घेतात.

 • अंधारात घाव घालणे – नकळत नुकसान करणे.

चीनने पाकिस्तानशी संगनमत करुन भारतवर अंधारात घाव घातला.

 • कोंबडे झुंजविणे – भांडण लावून मजा पहाणे.

गावच्या जमेत कोंबडे झुंजवण्याची नुसती स्पर्धा सुरु असते.

 • गाढवाचा नांगर फिरवणे – पूर्ण वाटोळे करणे.

मध्ययुगात जहांगीरदार आपल्याविरुध्द वागणाय्राच्या घरादारांवरुन गाढवाचा नांगर फिरवीत.

आता काही वाकप्रचार पाहू –

 • गाई पाण्यावर येणे – रडायला येणे.
 • घर बसणे – एखाद्या कुटुंबाचा पूर्ण नाश होणे.
 • घोडे मारणे – आगळीक करणे.
 • चौदावे रत्न दाखविणे – खूप मार देणे.
 • झाडा देणे – परिणाम भोगणे.
 • डोके देणे – धीराने तोंड देणे.
 • तुपाच्या आशेने उष्टे खाणे – फायद्यासाठी अपमान सहन करणे.
 • नशीब सिकंदर असणे – काळ अनुकूल असणे.
 • धूळ चारणे – मानभंग करणे.
 • नाकात काड्या घालणे – खिजवणे.
 • पैसा पासरी असणे – मुबलक असणे.
 • नाकातले केस गळणे – मनाला झोंबेल असे बोलणे.
 • पाणी लागणे – अंगी गुण येणे.
 • पाणी पाजणे – नुकसानीत आणणे.
 • पोट बांधणे – उपाशी राहणे.
 • पोटाची दामटी वळणे – खूप भूक लागणे.
 • बाहुली प्रमाणे नाचवणे – आपल्या तंत्राप्रमाणे वागविणे.
 • मिशीला पीळ देणे – बढाई मारणे.
 • मिशांना तूप लावणे – उगीच ऐट करणे.
 • लांडगेतोड करणे – शत्रूवर तुटून पडणे.
 • खेडी उडवणे – फजिती करणे.
 • वाघाचे कातडे पांघरणे – मुद्दाम ढोंग करणे.
 • वेसण घालणे – मर्यादा घालणे.
 • सोन्याचा धूर निघणे – खूप संपत्ती असणे.
 • शंभर वर्ष भरणे – नाशाची वेळ येणे.
 • हातावर शीर घेणे – जिवावर उदार होणे.
 • हात ओला करणे – जेवावयास घालणे.
 • तोंडपाटीलकी करणे – काहीही कृती न करता नुसती बडबड करणे.

 

म्हणी – वाकप्रचार आणि म्हणींना वेगळा अर्थ प्राप्त झाल्याने ते मनोरंजक ठरतात.

नमुन्यादाखल काही म्हणी पाहू –

 • अडली गाय फटके खाय – अडचणीत सापडलेल्या माणसाला अपमानास्पद शब्द ऐकून घ्यावे लागतात.
 • उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक – एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते.
 • कसायाला गाय धार्जिणी – खापट माणसापुढे गरीब माणसे नमतात.
 • काप गेले पण भोके राहिली – अधिकार व संपत्ती जाते पण त्यापेक्ष्या अंगी बाणलेल पोकळ अभिमान मात्र कायम असतो.
 • काकडीची चोरी फाशीची शिक्षा – लहानशा अपराधासाठी फार मोठी शिक्षा होणे.
 • कामापुरता मामा – गरजेपुरता गोड बोलणारा.
 • कुंपणानेच शेत खाल्ले – रक्षकानेच चोय्रा केल्या.
 • जी खोड बाळा ती जन्म काळा – जन्मजात अंगी अरलेले गुण अगर दुर्गुण जन्मभर जात नाहीत.
 • ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी – एकाच गावातील लोक एकमेकांना चांगले ओळखतात.
 • कोरड्याबरोबर ओले जळते – अपराध्याबरोबर निरपराध्यांनाही दोष दिला जातो.

आता काही अत्यंत प्रसिध्द म्हणी पाहू या.

 • दे माय धरणी ठाय करणे.
 • नवी विटी नवे राज्य.
 • दाम करी काम.
 • दगडापेक्षा वीट मऊ.
 • पळसाला पाने तीनच.
 • पाचामुखी परमेश्वर.
 • बारभाईची शेती काय लागेल हाती.
 • मूल होईना सवत साहीना.
 • राजाला दिवाळी ठाऊकच नाही.

सौजन्य: उषा कळमकर