काव्यवृत्ते

मराठी काव्यातील वृत्तबद्ध रचनेसाठी लघु-गुरु अक्षरांच्या सहायाने, अनेक प्रकारच्या वृत्तांचा वापर केला जातो. लघु अक्षरासाठी ‘U’ ही खूण वापरली जाते, तर गुरु अक्षरासाठी ‘-’ ही खूण वापरली जाते. प्रत्येक लघु अक्षरासाठी १ मात्रा मोजली जाते, तर प्रत्येक गुरु अक्षरासाठी २ मात्रा मोजल्या जातात. ही वृत्ते, ‘अक्षर-गण वृत्त’ आणि ‘मात्रा-वृत्त’ या दोन प्रमुख प्रकारात विभागली जातात.

अक्षर-गण वृत्त

यामध्ये तीन अक्षरांचा किंवा चार मात्रांचा, लघु-गुरु क्रमानुसार एक गण मानला जातो.
लघु-गुरु मात्रांनुसार, ‘य’, ‘र’, ‘त’, ‘न’, ‘भ’, ‘ज’, ‘स’, ‘म’ अशा ८ नावांनी हे गण ओळखले जातात. खालील कोष्टकावरून आणि उदाहरणांवरून हे समजणे सोपे जाईल…

गण मात्रा लगावली उदाहरण
य ५ U – – यमाचा
र ५ – U – राधिका
त ५ – – U ताराप
न ३ U U U नमन
भ ४ – U U भास्कर
ज ४ U – U जनास
स ४ U U – समरा
म ६ – – – मानावा

लघु स्वरापुढे जेव्हां अनुस्वार, विसर्ग किंवा संयोग (जोडाक्षर) येतो, तेव्हां तो त्या लघु स्वरास गुरुत्व देतो. तसेच, मागील लघु अक्षरावर जेव्हां पुढील संयुक्ताक्षराने उच्चारणात आघात होतो, तेव्हां त्यास गुरुत्व येते. जसे, कित्ता, थट्टा, गप्पा, हुद्दा इ.
चारणामध्ये अक्षरसंख्या जास्त असल्यास, जो अल्पविराम घेतला जातो, त्याला ‘यती’ म्हणतात. चरणातील कितव्या अक्षरानंतर यती आहे, ते समजण्याकरिता, वृत्ताच्या नावापुढे, अंक लिहिण्याची पद्धत आहे. जेथे चरणाच्या शेवटी (पदांती) यती आहे, तेथे ‘य.पा.’ लिहिले जाते.
वृत्ताचे चार भाग असून, प्रत्येक भागाला चरण किंवा पाद म्हणतात. ज्यांचे चारही चरण सारखे असतात ती समवृत्ते, ज्यांचे प्रथम व तृतीय चरण आणि व्दितीय व चतुर्थ चरण सारखे असतात ती अर्धसमवृत्ते आणि ज्यांचे चारही चरण भिन्न लक्षणांचे असतात ती विषमवृत्ते म्हणून ओळखली जातात.
नमुन्यादाखल अशा काही वृत्तांची ओळख करून घेऊ…

मात्रावृत्ते

ज्या पद्यांची रचना मात्रागणांनी समजते त्यांस जाति म्हणतात. ५४, ५७, ६०, ६२ व ६४ अशा मात्रांचे हे जातीप्रकार आहेत. उदाहरणार्थ…

आर्यालक्षण (मात्रा ५७)
पहिल्या चरणांत १२ मात्रा, दुसय्रा चरणांत १८ मात्रा
तिसर्या चरणांत १२ मात्रा, चौथ्या चरणांत १५ मात्रा

नूतन पल्लव फुटला ! असला तरु आणिला प्रियेने तो !!
लवकर चाखायाला ! तोंडाशी गज पहा नेतो !!

अक्षरगणवृत्ते

अक्षरगणवृत्तांची काही उदाहरणे…
पदाक्षरे १० : कामदा (यती ५, ५) मात्रा : १६, गण : र, य, ज, ग
अंतरातुनी रंगताच मी ! चाललो कुठे एकटाच मी !!

पदाक्षरे १२ : भुजंगप्रयात (६, ६) मात्रा : २०, गण : य, य, य, य
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ! तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे !!

पदाक्षरे १२ : स्रग्विणी (य. पा.) मात्रा : २०, गण : र, र, र, र
सूर्य केंव्हाच अंधारला यार हो ! या नवा सूर्य आणू चला यार हो !!

पदाक्षरे १९ : शार्दूलविक्रीडित (१२. ७.) मात्रा : २६, गण : म, स, ज, स, त, त, ग
सोन्याचा दिन घेउनी उगवला हे कांचनाचे क्षण ! वाटे, मंगला स्वयेच करिते ही आपुली शिंपण !!

 

गझलवृत्ते

गझलवृत्तामधे लघु-गुरु क्रमाला ‘लागावली’ म्हणतात. यात एका ‘गुरु’च्या ऐवजी दोन ‘लघु’ ही सवलत घेता येते. गझलवृत्तांची काही उदाहरणे…
मेनका मात्रा : १९, लगावली : गालगागा गालगागा गालगा
डाव मित्राचेच होते नेमके ! घाव मित्राचेच होते नेमके !! – ए. के. शेख
हा जरी रास्ता चुकीचा वाटला ! भेटला तो ओळखीचा वाटला !! वा. न. सरदेसाई

मंजुघोषा मात्रा : २१, लगावली : गालगागा गालगागा गालगागा
चालताना नाम त्याचे रोज घ्यावे ! ओळखीची हाक येता देव धावे !! – किरण जोगळेकर
मानतो स्वातंत्र्य मी माझे असे की ! ना कुणी माझा धनी … ना दास माझा !! वा. न. सरदेसाई

विद्युल्लता मात्रा : २२, लगावली : गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा
हे का कुणी फुलांना सांगायला हवे ? त्यांनी कसे ऋतूंशी वागायला हवे !! – वा. न. सरदेसाई

आनंदकंद मात्रा : २४, लगावली : गा गा ल गा ल गा गा
केव्हां तरी पहाटे उतरून रात्र गेली ! मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली !! – सुरेश भट
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा ! बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा !! – ईलाही जमादार

प्राकृत छंद
अभंग, दिंडी, साकी, ओवी इ.

अभंग : मोठ्या अभंगाचे २ आणि लहान अभंगाचे ३ असे अभंगांचे ५ प्रकार आहेत.

मोठा अभंग : यात चार चरण असून, पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी सहा अक्षरे आणि चौथ्या चरणांत चार अक्षरे असतात. यातील पहिल्या प्रकारात, दुसय्रा व तिसय्रा चरणाच्या शेवटी यमक असते. उदाहरण –
जगाच्या कल्याणा ! संतांच्या विभूती ! देह कष्टविती ! उपकारे !!

दुसय्रा प्रकारांत, पहिल्या तीनही चरणात यमक असते. उदाहरण –
जन हे सुखाचे ! दिल्या घेतल्याचे ! बा अंतकाळीचे ! नाही कोणी !!

लहान अभंग : यात दोन चरण असून, प्रत्येक चरणांत आठ अक्षरे असतात. क्वचित पहिल्या चरणात सहा अक्षरे असतात. दोन्ही चरणांत यमक असते. उदाहरण –
जरी व्हावा तुज देव ! तरी सुलभ उपाव !! १ !!
करी मस्तक ठेंगणा ! लागे संतांच्या चारणा !! २ !!
भावे गावे गीत ! शुद्ध करोनिया चित्त !! ३ !!
तुका म्हणे फार ! थोडा करी उपकार !! ४ !!

दुसय्रा प्रकारांत, दुसय्रा चरणाची सात अक्षरे असून, चौथे यमकाक्षर असते. उदाहरण –
पुढे आता कैचा जन्म ! ऐसा श्रम वारेसा !! १ !!
पांडुरंगा ऐसी नाव ! तारि भाव असता !! २ !!

तिसय्रा प्रकारांत, प्रत्येकी आठ अक्षरांचे चार चरण असून, पहिल्या तीनही चरणात यमक असते. उदाहरण –
देवा पायी नाही भाव ! भक्ति वरी वरी वाव !
समर्पिला नाही जीव ! जाणावा हा व्यभिचार !!

दिंडी : चार चरण. कधी दोन-दोन चरणांत, तर कधी चारी चरणांत यमक असते. यांत १९ मात्रा असून, ९ व्या मात्रेवर अवसान (यती) असते. यातील पहिल्या भागात, ३ आणि ६ मात्रांचे गण, तर दुसय्रा भागात ३ मात्रांचे दोन गण व त्यांच्यापुढे २ गुरु असावे. उदाहरण –
कथा बोलू हे मधुर सुधाधारा ! होय शृंगारा करूणरसा थारा !!
निषधराजा नळ नामधेय होता ! वीरसेनाचा तनय महा होता !!

ओवी : चार चरण. पहिल्या तीनही चरणात यमक असते.

 

संदर्भ : वृत्तांच्या अधिक माहितीसाठी काही पुस्तकांचे संदर्भ –
•वृत्तदर्पण
•गझलेची बाराखडी
•गझलचे छंदशास्त्र
•वाह ! गझल
•गजलचे अंतरंग
•अंगाई ते गझल – रुबाई : समग्र वा. न. सरदेसाई

 

सौजन्य: विजय चिपळूणकर